
गोळप कट्टाच्या ऑक्टोबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारच्या ७२ व्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून रत्नागिरी येथील तबला, गायन विशारद आणि रत्नागिरीतील पहिले हार्मोनियम अलंकार असलेले श्री. विजय रानडे होते. आपला प्रवास सांगताना….
आमचं मूळ गाव गुहागर तालुक्यात पाचेरी सडा. आजोबा गायक आणि कीर्तनकार होते. माझे बाबा आणि काका रत्नागिरीत आले. त्यांनी १८ ऑक्टोबर १९४४ या दिवशी कोकणातील पहिलं संगीत विद्यालय सुरु केलं. योगायोगाने तो आजचाच दिवस आहे. आज या विद्यालयाला ८२ वर्ष पूर्ण झाली. अजूनही हे सुरु आहे. बाबा विनायकबुवा रानडे तबला, हार्मोनियम चे व काका भालचंद्रबुवा रानडे गायनाचे क्लास घ्यायचे.मी लहानपणापासून ते बघत आलो त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षांपासून तबला वाजवायची आवड लागली. रत्नागिरीत परीक्षा केंद्र होतं आणि ते सुरु राहावं यासाठी बाबा, काका आणि हिरेमठ सर विद्यार्थी जमवत आणि परीक्षेला बसवत असत. पस्तीस परीक्षार्थी आवश्यक असत. जेणेकरून रत्नागिरी केंद्र सुरु राहील. ९० सालापर्यंत मी फक्त तबला वाजवत असे मात्र केंद्र सुरु रहावे यासाठी हार्मोनियम च्या तीन परीक्षा दिल्या होत्या.
१९९० साली माझी दहावी झाली आणि बाबा खूप आजारी होते. अंथरुणाला खिळले होते. विद्यालय सुरु रहावे म्हणून मी त्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. त्या दरम्याने पालकांमध्ये संगीत विषयात मुलांनी काही शिकावे असं वाटायला लागलं होतं. त्या वेळी पहिली पासूनच्या लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली. मुलांना त्याच वयात आवड लागू शकते किंवा त्यांच्यातील कला कळते. त्याचा मुलांना फायदा होतो. ९४ मध्ये तबला विशारद झालो आणि नंतर हार्मोनियम ची चौथी परीक्षा दिली. हार्मोनियम हे पूर्वी फक्त साथ करण्याचे वाद्य समजत होते. त्याला छेद देत सोलो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला.
१९९६ साली हार्मोनियम विशारद झालो. वीस वर्षांनी २०१६ मध्ये अलंकार झालो. कारण त्या काळात अलंकार असलेल्या गुरुची फॉर्मवर सही लागत असे आणि इकडे कोणी नव्हते. नंतर नियम बदलला आणि मी कोल्हापूर येथे परीक्षा देऊन अलंकार झालो. गंगाधर भाऊ पटवर्धन इंग्रजी शाळा म्हणजे जीजीपीएस शाळा सुरु झाली त्यातील मी पहिला शिक्षक आणि संगीताचा म्हणून मला स्व.अरुअप्पा जोशी यांनी संधी दिली. तिथे लक्षात आलं की क्लास वेगळा आणि वर्गातील सगळ्या मुलांना शिकवण वेगळं. मग बडबड गीते, नवीन जुनी गाणी त्यांना छान चाली लावून मुलांना गाणे, तबला, हार्मोनियम यांची आवड लागण्यासाठी प्रयत्न केला. राष्ट्रभक्ती ची गाणी, समूह गीते असे अनेक उपक्रम केले.
दरम्यान स्वामी स्वरूपानंद यांच्या संजीवन गाथा मधील अनेक अभंगाना चाली लावून संगीतबद्ध करत होतो. याच काळात २००१ साली खल्वायन संस्था संगीत नाट्य स्पर्धेसाठी डॉ.श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेलं सं. घन अमृताचा हे नाटक सादर करणार होते. त्यासाठी तेंडुलकर सर यांनी मला संगीत देण्याबद्दल विचारले. मी खूपच नवखा होतो. मात्र सगळ्या गाण्यांना चाली लावल्या. सर्वानुमते त्या अंतिम केल्या. या गाण्यांना कै. आनंद प्रभुदेसाई यांनी उत्तम न्याय दिला. नाटक स्पर्धेत पहिलं आलं. मला संगीतकारच बक्षीस मिळालं. त्यानंतर २००३ला पुन्हा एकदा डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित सं. शांतिब्रह्म हे नाटक खल्वायन संस्थेने स्पर्धेत सादर केले. याच्यातही सगळ्या गाण्यांच्या उत्तम चाली बांधल्या होत्या. नाटकाला मी संगीत दिलं होतं शिवाय ऑर्डर साथ केली होती. या नाटकात इतिहास घडला. नाटक पहिलं आलं शिवाय १९७४ नंतर पहिल्यांदा मला संगीतकार आणि ऑर्गन वादक अशी दोन बक्षिसे मिळाली. सहसा अशी दोन बक्षिसे कुणाला दिली जात नाहीत. मधल्या काळात फक्त क्लास आणि शाळा यामध्ये गुंतल्यामुळे संगीत नाटका पासून दुरावलो होतो.
मात्र २०२३ साली पुन्हा एकदा “संगीत मल्लिका” या अमेय धोपटकर यांनी उत्तम लिहिलेल्या कलारंग खंडाळा या संस्थेच्या नाटकाला संगीत देण्यासाठी संधी मिळाली. गायिका बेगम अख्तर यांच्या जीवनावर हे नाटक आहे. या नाटकासाठी मला पुन्हा एकदा संगीतकार चे बक्षीस मिळाले. यंदाही एका नव्या नाटकाचे संगीत सुरु आहे. माझ्या क्लासमध्ये जुन्या मुलांना मी नवीन मुलांना शिकवायला लावतो. त्यामुळे त्या मुलांचा शिकवताना उत्तम सराव होतो. मी कायम शिकवताना शिष्य माझ्यापुढे गेले तर आनंद आहे अशा भावनेने शिकवतो. आज वरद सोहोनी,चैतन्य पटवर्धन सारखे शिष्य हार्मोनियम मध्ये चांगल्या प्रकारे नाव कमावून आहेत. शतसंवादिनी सारख्या कार्यक्रमात आज रत्नागिरीतील सत्तर मुले हार्मोनियम वाजवताना दिसतात हे रत्नागिरीसाठी भूषण आहे.
जीजीपीएस शाळेत संगीत शिकवताना आई बाबा आणि मुलं या दोघांना शिकवण्याचा अनुभव घेता आला. याशिवाय श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गायन, तबला आणि हार्मोनियम यापैकी शिकण्यासाठी सगळंच कठीण आहे मात्र चिकाटी, आवड, मेहनत घेतली तर सगळं सोपं आहे. हल्ली मुले मार्क मिळतात यासाठी संगीत, कला शिकताना आढळतात. मुलांना सगळं झटपट हवं आहे. गाणी मुलांना ऐकायची सवय नाही तर पाहायची सवय लागली आहे.”गाणे कुठे पहायला मिळेल?” असा मुलांचा प्रश्न असतो. जीजीपीएस च्या संगीत च्या मुलांना दोन वेळा खल्वायन संस्थेने संगीत मैफिल करण्याची संधी दिली त्यात शास्त्रीय संगीत ते अभंग मुलांनी गायले आणि वाजवले याच समाधान आहे.
कोरोना काळापासून नवीन नवीन गाणी संगीतबद्ध करून यु ट्यूब चॅनेल ला ठेवतो. संगीत हा आत्मा आणि आवड असल्याने तेच करत राहायचे आहे. अजूनही संगीतातील नवीन गोष्टी शिकत आहे. याशिवाय त्यांनी अनेक घटना, अनुभव, किस्से सांगितले. यानंतर त्यांनी आग्रहास्तव स्वामींचा संगीतबद्ध केलेला अभंग गायला. त्यानंतर श्रोत्यांमधील श्री. दिवेकर यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करून कार्यक्रम संपला.
आता पुढील महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पुन्हा भेटू एका वेगळ्या व्यक्ती बरोबर….
अविनाश काळे, ९४२२३७२२१



