रत्नागिरी

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात यश!

गणपतीपुळे दि. १८ (वैभव पवार) :-  रत्नागिरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांना यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योतिबा डोंगरवाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणाहून निशा अजय सांगळे वय वर्षे 30, हर्षदा प्रमोद मिटले वय वर्षे 30,आणि तनुजा रमेश आभाळे वय वर्षे 17 या तिघीजणी शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी आपल्या फॅमिली सहित पर्यटनासाठी आल्या होत्या. यावेळी त्या समुद्रात समुद्रस्नान करण्याचा आनंद घेत असताना समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्टच्या व्यवसायिकांनी आपल्या स्पीड बोटीच्या सहाय्याने तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेत पाण्याबाहेर काढले. त्यामुळे तिघींनाही वाचविण्यात वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांना यश आले.

यावेळी त्यांना गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि गणपतीपुळे चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांची मोलाची मदत प्राप्त झाली. या तिन्ही महिलांना सुरक्षित रित्या समुद्राच्या पाण्याबाहेर काढल्यानंतर जीव रक्षक, वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि गणपतीपुळे पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या ॲम्बुलन्सने नेले. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. ही कामगिरी केल्याबद्दल गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button