देवरुखातील सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणात एकूण १२ आरोपींचा सहभाग!
आतापर्यंत सातजण पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी दि. ९ :- संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या देवरुखातील सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणात एकूण १२ आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करताना देवरुख पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे; मात्र, या गुन्ह्यातील पाच मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाली आहे.
सोने व्यापारी धनंजय केतकर हे साखरप्याहून देवरुखच्या दिशेने येत असताना वांझोळे येथे त्यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक्कम लुटून त्यांना काही अंतरावर असलेल्या वाटूळ येथे सोडून दिले होते. या घटनेनंतर केतकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली. देवरुख पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही दिवसांतच या गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश केला.
आत्तापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्याच्या मुळाशी जाताना एक महत्त्वाची बाब उघड झाली. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील दोन स्थानिक तरुणांनी मुंबईजवळील बदलापूर येथील तरुणांना हाताशी धरून व्यापारी केतकर यांचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. तपासाच्या अंतिम टप्प्यात, या अपहरणाच्या कटात सामील असलेल्या आरोपींची एकूण संख्या १२ असल्याचे निश्चित झाले आहे. यातील ५ आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.


