नाटे पोलीस ठाणे हद्दीत वृद्ध व्यक्तीची सोनसाखळी खेचून चोरटा फरार
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

नाटे दि. २६ :- नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडीवरे ते वैत्ये जाणाऱ्या रस्त्यालगतच्या रानात एका अज्ञात दुचाकीस्वाराने एका वयोवृद्ध इसमाची सोनसाखळी (चैन) जबरीने खेचून घटनास्थळावरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस अधीक्षकांकडून तात्काळ भेट
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन तपासाबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणून आरोपीला गजाआड करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना
सध्या या गुन्ह्याचा तपास नाटे पोलीस ठाण्यामार्फत अत्यंत वेगाने सुरू आहे. आरोपीचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह (LCB) पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून ठिकठिकाणी नाकाबंदी व शोधमोहीम राबवली जात आहे.


