“मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाची अमली पदार्थ विरोधी धडक कारवाई; तीनजण ताब्यात

रत्नागिरी दि. २९ :- “मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाची अमली पदार्थ विरोधी धडक कारवाई करताना तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात एकूण 5.729 किलो ग्रॅम वजनाचा ₹ 22,92,400/- किमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे दिनांक १५ सप्टेंबर रोजी दापोली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. महेश तोरसकर यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील केळशी किनारा मोहल्ला ता. दापोली येथे पोलीस पथक व दोन पंचासह अंमली पदार्थ विरोधी कारवाई करिता छापा टाकला असता तेथील राहणाऱ्या 1) अब्रार इस्माईल डायली, वय-32 रा. केळशी किनारा मोहल्ला तालुका दापोली याच्या राहत्या घराच्या मागील पडवीत चरस सदृश्य अंमली पदार्थ मिळून आलेला आहे.
आरोपी अब्रार इस्माईल डायली, वय-32 रा. केळशी किनारा मोहल्ला तालुका दापोली याच्या घर झडतीमध्ये एकूण 0.998 किलो ग्रॅम वजनाचा सुमारे ₹4,00,000/- किमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. हा अंमली पदार्थ एका गडद लाल सोनेरी रंगाच्या प्लास्टिकच्या वेष्टनात आतून हिरव्या रंगाच्या पॅकिंग मध्ये ठेवलेला होता या वेष्टनावर इंग्रजीत सिक्स गोल्ड (6-Gold) व कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला तसेच यातील सर्व मुद्दे माल जप्त करण्यात आलेला असून आरोपी अब्रार इस्माईल डायली, वय-32 रा. केळशी किनारा मोहल्ला तालुका दापोली याचे विरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 173/2025 एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब) (ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाखल गुन्ह्याचा कसून तपास करीत असताना गुन्ह्यातील आरोपी अब्रार इस्माईल डायली यांच्याकडे तपास केला असता त्यास केळशी मोहल्ला येथे वास्तव्यास असलेला 2) अकिल अब्बास होडेकर, वय-49 वर्षे रा. उंबरशेत केळशी तालुका दापोली याने सदरचा चरस सदृश्य अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने दिला होता हे निष्पन्न झालेवरुन अकिल अब्बास होडेकर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता या आरोपीने आणखी 4 पिशव्या त्याच्याकडे असल्याबाबत तसेच त्या त्याने मंडणगड तालुक्यातील साखरी गावाचे समुद्र किनारी झुडुपात लपवून ठेवल्या असल्याचे कबूल केल्याने साखरी समुद्र किनारी जाऊन 4 पिशव्या पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
साखरी गावाचे समुद्र किनारी एकूण ₹18,92,400 किमतीचा 4.731 किलो ग्रॅम वजनाचा चरस सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला असून दाखल गुन्ह्यात एकूण 5.729 किलो ग्रॅम वजनाचा ₹22,92,400/- किमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे.
तपासात या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने तपासा अंती 3) ताबीस महमूद डायली वय-30 वर्षे रा. केळशी किनारा मोहल्ला यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे, असे एकूण तीन 3 आरोपी यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे.
शिळ डायघर पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 867/2025 एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी मसुद बद्रुद्दीन ऐनरकर वय-29 रा. अपनानगर, खोंडा दापोली ता. दापोली जि. रत्नागिरी याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न होत असून सदर आरोपीत याचा मा. न्यायालय, ठाणे यांचे कडून ताबा घेणेत येणार असून या आरोपीकडे देखील कसून चौकशी करणेत येणार आहे.
अंमली पदार्थ गुन्ह्याचे अनुषंगाने आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून अधिक तपास सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग श्री. शैलेश सणस यांचे मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, स.पो. फौ / गायकवाड, पो.हवा / मोहिते, पो.हवा/ढोले, पो.शि/ भांडे, पो.शि/ टेमकर, पो.शि/ दिंडे व म.पो.शि / पाटेकर.



