रत्नागिरी

साडवली येथे जनजागृती रॅली, पथनाट्य आणि ‘मॉडेल फार्मसी’चे उद्घाटन

जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात!

देवरुख दि. २६ : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त (World Pharmacist Day) साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन केले. महाविद्यालय आणि संगमेश्वर तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली, पथनाट्य (Street Play) आणि नव्याने स्थापन केलेल्या मॉडेल फार्मसीचे उद्घाटन करण्यात आले.

जनजागृती रॅलीतून औषध शास्त्राचे महत्त्व

४०० हून अधिक फार्मासिस्ट आणि विद्यार्थ्यांनी ‘औषध निर्माणशास्त्राचे महत्त्व’ आणि ‘रुग्णांना औषधांविषयी योग्य मार्गदर्शन’ (Patient Counselling) यांसारखे संदेश देणारे फलक घेऊन भव्य रॅली काढली. फार्मासिस्टची भूमिका आणि औषधांच्या सुरक्षित वापराबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा उद्देश होता.

पथनाट्यातून फार्मासिस्टची प्रभावी भूमिका

छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात पथनाट्याचे सादरीकरण झाले. समाजाच्या आरोग्यासाठी फार्मासिस्ट किती महत्त्वाचा दुवा आहेत, हे या पथनाट्यातून प्रभावीपणे दाखवण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांनी फार्मासिस्टच्या योगदानाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांसाठी मॉडेल फार्मसीचे उद्घाटन

महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मॉडेल फार्मसीचे उद्घाटन संस्थेच्या कार्यध्यक्षा सौ. नेहाजी माने यांच्या हस्ते झाले.

प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी मॉडेल फार्मसीच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “ही मॉडेल फार्मसी आमच्या तरुण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण (Experiential Learning) घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. ” विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालय आणि औषधविक्रीच्या वातावरणाचा आणि रुग्ण समुपडदेशनचा अनुभव घेता यावा, यासाठी हे मॉडेल महत्त्वपूर्ण आहे. डॉ. खाडे यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने यांनी आपल्या भाषणात फार्मासिस्टच्या योगदानाची प्रशंसा करत विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेत समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button