सुनील नावले यांनी जी स्वप्ने पाहिली ती पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असून, तीच खऱ्या अर्थाने आदरांजली असेल – ना. डॉ. उदय सामंत

रत्नागिरी दि. १८ :- सुनील नावले हे आपले मित्र होते. एक सच्चा कार्यकर्ता होता. त्याच्या अकाली जाण्याने पक्षाचे नुकसान झालेच आहे, मात्र व्यक्तिगत पातळीवर माझेही नुकसान झाले आहे. त्यामुळे सुनील नावले यांनी जी स्वप्ने पाहिली ती पूर्ण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. आज आपण सर्वांनी त्यांने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करूया. जर त्याप्रमाणे आपण कामाला लागलो तर ती सुनील नावले यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, अशा शब्दात रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांचे निधन झाले. कै. सुनील नावले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. डॉ. उदय सामंत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, बाबू म्हाप, सुदेश मयेकर, राजन शेट्ये, गजानन पाटील, जयसिंग घोसाळे, शांताराम मालप, शिल्पा सुर्वे यांचें शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले की, १९९९ पासून २०२५ पर्यंत सुनील नावले याने आपलेकडे एकही पद मागितले नाही. विकास कामांची मागणी केली नाही. पद नाही म्हणून कधीच नाराज झाला नाही. आपण सांगितलेली जी जबाबदारी तो यशस्वीपणे पूर्ण करायचा. २५ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत जो जो आपण निर्णय घेतला त्यावेळी पहिले समर्थन सुनीलचे असायचे. एक प्रकारे त्याने माझ्यावर विश्वास दाखवला होता.
आज आंबा बागायतदारांना जे ८ ते ८.५० कोटी मिळाले त्याचे एकमेव कारण म्हणजे सुनील नावले. त्याने स्वतःसाठी कधीच काही माझ्याकडे मागितले नाही. आज पंचायत समितीची इमारत केवळ सुनील नावले यांच्या पाठपुराव्यामुळे होत आहे. एक प्रकारे विधायक काम करण्याची त्याची वृत्ती होती, असे ना. डॉ. सामंत म्हणाले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले.



