देवरूखच्या सृजन विज्ञान केंद्रातील ‘कल्पना चावला अवकाश शास्त्र व तंत्रज्ञान संग्रहालय’ प्रकल्पाचे उद्घाटन

देवरुख दि. ७ सप्टेंबर ( प्रतिनिधी ):- कोकण भागातील एकमेव असलेल्या सृजन विज्ञान केंद्र या बालविज्ञान केंद्रामध्ये नव्याने उभारलेल्या ‘कल्पना चावला अवकाश शास्त्र व तंत्रज्ञान संग्रहालय’ प्रकल्पाचे उद्घाटन आज सोमवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे शुभहस्ते आणि श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान मंडळाचे अध्यक्ष निलेश कोल्हटकर यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या संग्रहालयामध्ये चांद्रयान, गगनयान, मंगलयान, करायोजेनिक इंजिन या भारतीय एक्झिबीट पासून अपोलो ११, व्हायजर, चॅलेंजर, कोलंबीया ते आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र, विविध अस्ट्रॉनॉमी मॉडेल्स आहेत, आणि विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे ६ इंच व्यासाची स्वयंचलित दुर्बीण आहे.
देशाचे नाव उज्वल करणाऱ्या स्वर्गीय कल्पना चावला यांच्यासारखी भव्य दिव्य स्वप्न पाहून ती पूर्ण करण्याची जिद्द जनरेशन अल्फाच्या तरुणांमध्ये निर्माण व्हावी, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या अनेक संधींचा लाभ घेण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना तयार करावे या उद्देशाने हे संग्रहालय बनवण्यात आले आहे असे सृजन विज्ञान केंद्राचे संस्थापक आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी विज्ञान विज्ञान केंद्रासारखी आधुनिक सुविधा देवरुख सारख्या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष श्री निलेश कोल्हटकर यांनी श्रीगणेशाचे आशीर्वाद म्हणून देवस्थान या उपक्रमाला सातत्याने मदत करत राहील अशी ग्वाही दिली.
सृजन विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी या सुविधेचा कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या बुद्धिमत्तेला नवीन पैलू पाडावेत असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. विदया खाडे यांनी केले. कार्यक्रमाला देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



