नारळ-सुपारीच्या साथीने पिकवा ‘काळे सोने’; वणौशीत काळी मिरी लागवडीचे धडे!

वणौशी दि. ८ सप्टेंबर (सागर गोवळे) :- नारळ-सुपारीच्या समृद्ध बागा आणि पोषक हवामानाची पार्श्वभूमी लाभलेल्या वणौशीच्या भूमीत आता ‘काळे सोने’ अर्थात काळी मिरी बहरणार आहे. या भागात काळी मिरी लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ‘कृषी स्नेही’ गटातर्फे ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा’ अंतर्गत विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. गोपाळ परांजपे व श्रीमती विजया गुरव यांच्या बागेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक १० प्रयोगशील शेतकऱ्यांची उत्साही उपस्थिती लाभली.
या प्रात्यक्षिकादरम्यान नारळ व सुपारीच्या आधीच उपलब्ध असलेल्या झाडांचा आधार घेऊन काळ्या मिरीचे आंतरपीक कसे घ्यावे आणि मर्यादित जागेतून दुप्पट-तिप्पट नफा कसा मिळवावा, याचे प्रत्यक्ष गणित बागेत मांडण्यात आले. या वेळी वेलींची त्रिस्तरीय शास्त्रीय ओळख करून देताना झाडांवर थेट उंच चढण्यासाठी आधार देणारी ऑर्थोट्रॉपिक वेल, नवीन सशक्त रोपांच्या जलद निर्मितीसाठी जमिनीवर पसरणारी रनर्स वेल आणि कुंड्यांमध्ये आकर्षक ‘बुश पेपर’ पिकवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्लाजिओट्रॉपिक फांद्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कमी खर्चात नवीन वेली तयार करण्याचे सुलभ तंत्रज्ञान दाखवून काळ्या मिरीची बाजारातील मागणी व त्यातून मिळणाऱ्या भरघोस फायद्यांचे कोष्टक शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री. गोपाळ परांजपे यांच्या बागेत कोकणात सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या ‘पन्नियुर-१’ या उन्नत वाणाची प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. यासाठी सुपीक माती, उत्तम कुजलेले शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट यांचे योग्य मिश्रण वापरून शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे भरून नारळ बागेत लागवड करण्यातआली. यासोबतच सुपारी, पांगारा व सिल्व्हर ओक या झाडांच्या आधाराने रोपांची सुरक्षित लागवडीची माहिती देण्यात आली. ‘कृषी स्नेही’ गटाच्या या उपक्रमामुळे वणौशीतील शेतकऱ्यांना आंतरपिकाचे महत्त्व पटले असून, कमी खर्चात जमिनीची सुपीकता वाढवून स्वतःच्या बागांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा एक नवा व समृद्ध मार्ग उपलब्ध झाला आहे.
सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी , कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.



