नाटे पोलीस व एलसीबीची संयुक्त कारवाई; घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत आरोपी गजाआड
सोन्या-चांदीचे दागिने व मोटारसायकलसह २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जैतापूर दि. २९ जुलै :- नाटे पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचा गंभीर गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत नाटे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी), रत्नागिरी यांनी संयुक्तपणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाटे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ)) या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास नाटे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विकास टीपू पवार (वय २३), मूळ रा. निगडी ब्राद्रुक, ता. जत, जि. सांगली (सध्या रा. हुपरी, जि. कोल्हापूर) तसेच संपत बिल्लू पवार (वय २०), मूळ रा. हुबनूर, जि. विजापूर (कर्नाटक), सध्या रा. निगडी ब्राद्रुक, ता. जत, जि. सांगली यांचा समावेश आहे.
पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १ लाख ९१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी (लांजा विभाग) सुरेश कदम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत असून, नाटे पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



