रत्नागिरी शहर भाजपतर्फे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राजीवडा विश्वेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम

रत्नागिरी दि. ३१ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने मंगळवारी राजवाडा येथील विश्वेश्वर शिव मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
अहिल्यादेवी होळकर यांनी 18 व्या शतकात 28 वर्षे राज्य करताना त्यांनी संपूर्ण भारतभर उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वनाथ, सोमनाथ, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर यांसारखी 100 हून अधिक शिवमंदिरे त्यांनी उभारली. मंदिरासोबतच घाट, धर्मशाळा व अन्नछत्र बांधून यात्रेकरूंसाठी सोय केली. मुघल काळात खचलेला हिंदू समाजाचा स्वाभिमान त्यांनी दगडात कोरून पुन्हा उभा केला, म्हणूनच त्यांना ‘लोकमाता’ संबोधले जाते.
अहिल्यादेवींनी धर्म, संस्कृती आणि लोककल्याणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त शिव मंदिरांची स्वच्छता करून त्यांच्या ‘सेवा व स्वच्छतेच्या’ विचाराला कृतीतून वंदन करण्याचा हेतू होता, असे भाजपा पदाधिकारी यांनी सांगितले.
भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, मनोज पाटणकर, संतोष सावंत, शैलेंद्र बेर्डे, नगरसेवक संदीप सुर्वे, प्रशांत घाणेकर, विजया भाटकर, सारिका शर्मा, राजेंद्र फाळके. महिला मोर्चा शहर अध्यक्ष भक्ती दळी, संदीप सुर्वे यांच्यासह शहर मंडलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मंदिर परिसर, गाभारा व आवाराची स्वच्छता केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


