रत्नागिरीसामाजिक

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उल्हासपूर्ण वातावरणात साजरी

देवरुख दि. १४ ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी आपल्या प्रास्ताविकात छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदीप्यमान कार्यकर्तृत्वाचा इतिहास आणि संगमेश्वर तालुक्याशी असलेला भावनिक तसेच ऐतिहासिक संबंध विशद केला. संगमेश्वर ही भूमी संभाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत वेदनादायी घटनांची साक्षीदार असल्याचे प्रा. मायंगडे यांनी याप्रसंगी नमूद केले. प्रा. मायंगडे यांनी संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना, त्यांनी गाजवलेला पराक्रम व विजयी मोहिमा ज्याच्यामध्ये औरंगजेब विरुद्धचा लढा, बुरहानपूर मोहीम, पोर्तुगीज आणि सिद्दीविरुद्धचा संघर्ष, आग्र्याहून सुटकेतील महाराजांचे विलक्षण धाडस, पुरंदरच्या तहामधील बाल संभाजींनी दाखवलेला बाणेदारपणा व त्यांची निर्भीड भूमिका, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या गादीवर विराजमान झाल्यावर संभाजी महाराजांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय याबाबतच्या विविध घटनांचा सविस्तर उल्लेख प्रा. सुभाष मायंगडे यांनी यावेळी केला.

प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर विद्वान, दूरदृष्टी असलेले आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित नेतृत्व होते असे प्रतिपादन याप्रसंगी केले. संभाजी महाराजांचे संपूर्ण जीवन संघर्ष, स्वाभिमान आणि त्याग यांचे जिवंत उदाहरण असल्याचे प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी नमूद करून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महाराजांनी स्वराज्य टिकवण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी दिलेला लढा इतिहासात अजरामर असल्याचे प्रतिपादन केले. आजच्या तरुण पिढीने संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि संकटांशी लढण्याची वृत्ती आत्मसात करावी, असे प्रेरणादायी आवाहन प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी उपस्थिताना केले.

अभिवादनपर कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थ्यांसह, प्रा. धनंजय दळवी, कार्यालय अधीक्षिका मिता भागवत तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात जपण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्य अमोल वेलवणकर व रोशन गोरुले यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button