
देवरुख दि. २४ : देवरुख चोरपऱ्या बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला मशिद या मुख्य रस्त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्ष असतानाही शहर भाजपावतीने नगराध्यक्ष व प्रशासनाला निवेदन देण्याची वेळ आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येते आहे.
देवरुख शहरातील चोरपऱ्या- बाजारपेठ- ते मुस्लिम मोहल्ला मशीद या मुख्य रस्ताची अक्षरशहा चाळण झाली असताना या मतदारसंघाचे कार्यकुशल आम. शेखर निकम यांनी 30 आक्टोबरला हा रस्ता मे महिन्यापर्यंत पुर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याची घोषणा करत सदर कामासाठी सुमारे 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करून शहरवासीयांना दिलासा दिला होता. न. प. निवडणूकीत जनतेने ही राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा सेना महायुतीला परत सत्तेवर बसवले वर ही जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर मात्र नुतन पदाधिकारी गंभीर नाहीत अशी सामान्य जनात चर्चा सुरु असल्याचे दिसून येते आहे.
निवडणुकीत महायुतील सर्व मित्र पक्षांनी आपापल्या सोयीसाठी अंतर्गत शह काटशहाचे राजकारण करत नपवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवत मोठ्या जल्लोष करत वरिष्ठांना आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले होते.
या कामाची टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली असून ही पावसाळा तोंडावर आला तरी या कामास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टी देवरुख शहरवतीने नगर पंचायत प्रशासनाला निवेदन सादर करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा सुविधा योजनेतून 17 एप्रिल रोजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व आम. शेखर निकम यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे नप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ते भूमिपूजन किंवा प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नसल्याने तसेच पावसाळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असताना खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी अडचणी तात्काळ दूर करून रस्ता काम सुरू करावे व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विद्यमान आम. शेखर निकम, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, ठेकेदार यांच्याशी संयुक्त चर्चा करून रस्ता काम सुरू करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी भोसले यांनी शहर भाजपा शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती भाजपकडून सांगण्यात आली.
हे काम मंजूर असताना आता नक्की अडचणी का निर्माण होत आहेत? की महायुतील घटक पक्षाकडूनच शत प्रतिशत भाजपाला शह देण्यासाठी तर प्रयत्न केले जात नाहीत ना?सत्ताधारी भाजपामधे ही पक्षांतर्गत मतभेदाची ठिणगी तर पडली नाही ना? जनतेने भरभरुन मत देत सत्तेवर बसवलेल्यांना प्रशासकीय बाबी समजून घ्यायला वेळ नाही? अशा चर्चा सुरू झाल्या असल्याने आता हे खापर कोणावर फोडले जाणार याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.
सदर निवेदन नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व माजी उप नगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, संदीप वेलवणकर, शंकर मालप, संजय राजवाडे, राजाराम पंडित, अभिषेक निमकर, मानसी निमकर, हर्षद लिमये, चैतन्य बांडागळे आदी खंदे कार्यकर्ते उपस्थित होते.
