
जैतापूर दि. ३० :- दळे येथे जय निरंकारी क्रिकेट यंग स्टार दळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. दिनांक २८ व २९ मार्च रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत निवडक १६ संघांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांना थरारक आणि दर्जेदार सामने पाहायला मिळाले.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमोद वाघ (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सागरी पोलीस ठाणे नाटे), राजन लाड (उपाध्यक्ष, राजापूर तालुका पत्रकार संघ), संदीप शिवलकर, राजेंद्र प्रसाद राऊत, तसेच उदय गिरकर, संतोष लासे, अरविंद लासे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धेतील अंतिम सामना देवगड तालुक्यातील पडेल येथील पुष्पराम स्पोर्ट्स आणि भालावली येथील जेसीसी संघ यांच्यात रंगला. या सामन्यात पडेल संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत भालावली संघावर एकतर्फी विजय मिळवून विजेतेपद पटकावले. भालावली जेसीसी संघाने चांगली लढत देत उपविजेतेपद मिळवले.
तृतीय क्रमांकासाठी महापुरुष नाटे संघाने बाजी मारली, तर चतुर्थ क्रमांकासाठी एमबी स्पोर्ट्स कातळी संघाला बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी जब्बार काझी यांनी रोख १५ हजार रुपये बक्षीस दिले होते. द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये सौरभ मयेकर, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये संजय शिवलकर तर चतुर्थ क्रमांकासाठी २ हजार रुपये संदीप शिवलकर यांनी दिले होते.
स्पर्धेतील विजेत्या संघांना भव्य ट्रॉफी कैलासवासी सौ. नयना नारायण तांबे यांच्या स्मरणार्थ नितेश नारायण तांबे यांच्याकडून देण्यात आल्या. तर वैयक्तिक ट्रॉफी कैलासवासी सुनंदा सदानंद मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुजन सदानंद पंगेरकर यांनी प्रदान केल्या.
या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंनाही गौरविण्यात आले. मालिकावीराचा बहुमान भालावली जेसीसी संघाच्या निवृत्ती भोसले यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट विकेटकीपर म्हणून महापुरुष नाटे संघाच्या प्रसाद आरेकर यांनी बहुमान पटकावला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून पडेल संघाच्या अतुल यांना गौरविण्यात आले, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पडेल संघाच्या सुरज यांचा सन्मान करण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभासाठी जब्बार काझी, राजेंद्र प्रसाद राऊत, वैभव कुवेस्कर, राकेश दांडेकर, अरविंद लासे, राजन लाड, उदय गिरकर, संतोष लासे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद गिरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेचे समालोचन व सूत्रसंचालन पंकज पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडले.
दळे व परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



