रत्नागिरीसामाजिक

पुस्तक वाचक ऋणानुबंध जाणणारा द्रष्टा श्रीकांत

मोठमोठ्या ग्रंथालयात सुद्धा असे अनेक उपेक्षित ग्रंथ असतात की त्यांना वर्षानुवर्षे वाचकच भेटत नाहीत, त्यांचा मौलिक ज्ञानसाठा अस्पृश्यच राहतो आणि कालांतराने अशी ग्रंथसंपदा कालबाह्य ठरते, क्वचित रद्दीतही जमा होते. पुस्तके अनाथ होतात!

सुजान ग्रंथपाल, ज्ञानप्रेमी ग्रंथसेवक अशी अनाथ-अवस्था येऊ देत नाहीत. नित्याच्या कामकाजांबरोबरच त्यांची नजर एखादा ज्ञानप्रेमी वाचक शोधण्यावर असते. वाचनालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याला हवे असलेले पुस्तक विनाविलंब देण्यावर त्यांचा कटाक्ष असतोच शिवाय ग्रंथालयातील अनेक नव्या-जुन्या पुस्तकास वाचक लाभला पाहिजे याबाबत ते विशेष दक्ष असतात. ते खरेखुरे त्या त्या ग्रंथांची मौलिकता जाणणारे असतात; केवळ वेतनलक्षी नसतात तर विद्या सेवक असतात. असा ग्रंथपालक सेवक एका ग्रामीण भागातील कॉलेजला लाभला हे त्यांच्या ग्रंथालयाचे भाग्यच होय! नाव आहे त्याचे श्रीकांत पवार.

ग्रंथालयात नित्यनवी पुस्तके येत असतात शिवाय ज्यांची वर्गणी आधीच पाठवलेली असते अशी मासिके-साप्ताहिके यांची वेळोवेळी वाचनसामुग्री म्हणून भर पडत असते. त्यांची नोंद घेणे, नोंद ठेवणे ही कामे रोज चालू असतात. शिवाय वाचकांच्या गरजेप्रमाणे पुस्तके देणे घेणे हे या ग्रंथालय सेवकांचे प्रधान कार्य असते. अशी कामे कर्तव्य पूर्णतेने सांभाळून श्रीकांत नवीन नवी पुस्तके-मासिके मोठ्या उत्सुकतेने हाताळायचा, बाळाच्या जावळाहून हात फिरवावा तशा ममतेने नवे पुस्तक अंतर्बाह्य चाळायचा आणि अल्पशिक्षित असूनही (आणि प्रशिक्षित नसूनही!) त्याला पुस्तकाचा विषय कोणता आहे हे उमजायचे; सुदीर्घ अनुभव समृद्धीमुळे या पुस्तकाचा संभाव्य वाचक कोण असू शकेल, हे मनोमत ताडायचा, त्या व्यक्तीची अलिखित नोंद स्मरणात ठेवून ती व्यक्ती समोर आली की मोठ्या उत्साहाने त्यांना ते पुस्तक दाखवायचा. तो सुजाण वाचक आनंदित होऊन, त्याची नोंद करून पुस्तक घेऊन जायचा, उभयता संतृप्त व्हायचे! ग्रंथोत्सवाचे कारंजे क्षणभर अधिकच उसळायचे! ज्ञानाची सदावर्ते आनंदाची दिवाळी साजरी करायची!! इतर वेळी पुस्तकांच्या वखारी वाटणारी ग्रंथालये ज्ञानमंदिरे व्हायची!!

श्रीकांतची ही किमया परीक्षार्थी विद्यार्थी-अध्यापकांना कधीतरी उमजली असेल का हो? एक कर्मचारी ग्रंथालयसेवक म्हणूनही श्रीकांचे वर्तन अतिशय नम्र होते. स्वभाव तर शांतच होता. त्याची नेमणूक कॉलेजच्या प्रथम वर्षात प्रारंभ काळात झालेली होती. त्या दृष्टीने तो सर्व इतर सहकाऱ्यात ज्येष्ठ अन् श्रेष्ठ होता. पण त्याबाबतचा तोरा-डामडौल त्यांनी कधीच मिरवला नाही; बरोबरीच्याना दुखावले नाही की झाडलोटीची कनिष्ठ कामे कधी नाकारली नाहीत. तसेच घरची आर्थिक परिस्थिती बेतासबेत असूनही नडीकडीला पैशासाठी कधी कोणापुढे हातही पसरलेला आठवत नाही. उपजत सभ्यतेचे शहाणपण त्याच्याजवळ होतं. फुलांच्या सहवासात दिवसभर राहिलेल्यांच्या अंगाअंगातून परीमल दरवळावा तसं पुस्तकांच्या जगात आयुष्यभर वावरल्याने त्याचे उपजत शहाणपण वधारलेले असावे!

निवृत्तीनंतरच्या दहा-बारा वर्षाच्या काळात त्याने कौटुंबिक सौख्यसमाधान कटाक्षाने सांभाळले होते. खाण्यापिण्यात तो संयमीत आणि नियमित होता. काही वर्षांपूर्वी त्याचा कर्तासवर्ता मुलगा आकस्मित-अकाली निधन पावला पण त्या दुःखद आपत्तीतसुद्धा श्रीकांतने देवदुर्लभ विवेक दाखवून कुटुंबाला सावरले होते. शेजारीच राहणाऱ्या तीन चार बंधूंनाही त्याचा मोठा आधार होता. अशा या श्रीकांतला चालता बोलता असताना, खाता-पिता असताना, बाजारपेठेत हिंडून फिरून आल्या आल्या निद्रा देवीच्या आधीन झाला असता झोपेतच मृत्यू यावा, हे आजकालच्या विपरीत दुनियेत मोठे भाग्याचेच म्हणावे लागेल. गेल्या ७ मे, २०२६ रोजी रात्री श्रीकांत अर्जुन पवार अनंतात विलीन झाला!

त्याच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो!

डॉ. सुरेश जोशी, देवरुख.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button