क्रीडारत्नागिरी

डेरवण यूथ गेम्सच्या खो – खो स्पर्धेत ७२ संघाचा विक्रमी सहभाग

सांगली, पुणे, सातारा संघांचे वर्चस्व

संगमेश्वर दि . ४ ( प्रतिनिधी ):- एस.व्हि.जे.सी.टी.च्या क्रीडासंकुलावर १२व्या डेरवण यूथ गेम्स स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात शिव प्रतिष्ठान खंडाळा – सातारा तर मुलींच्या गटात राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ, पुणे तसेच १८ वर्षांखालील गटात राजेंद्र विद्यालय, खंडाळा – सातारा तर मुलींच्या गटात राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ, (भिलवडी) सांगली यांनी विजेतेपद पटकावले. यावर्षीच्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून खोखो संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत ७२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

१४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात शिवप्रतिष्ठान सातारा विरुद्ध रमणबाग मित्र मंडळ पुणे या अंतिम सामन्यात शिवप्रतिष्ठान संघाने एक डाव तीन गुणांनी विजय मिळवला. शिवप्रतिष्ठान संघाकडून वरद पोळ, आयुष यादव, स्वराज गाढवे यांनी उत्तम खेळ केला. रमणबाग संघाकडून वेदांत गायकवाड यांने चांगली कामगिरी केली.

मुलींच्या अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ पुणे संघाने राजमाता अहिल्यादेवी सांगली संघावर एक मिनिट राखून विजय मिळवला. पुणे संघाकडून अपर्णा वरदे, सई घरत यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर सांगली संघाकडून पायल तामखडे आणि अनुष्का तामखडे यांनी विजयासाठी प्रयत्न केले. १८ वर्षांखालील गटात मुलांचे विजेतेपद पटकावताना राजेंद्र विद्यालय, सातारा संघाने शिरसेकर गांधी मुंबई उपनगर या संघावर पाच गुणांनी विजय मिळवला. सातारा संघाकडून प्रेम लोखंडे, आयुष पवार, मयूर जाधव यांनी चांगला खेळ केला. तर उपनगर संघाकडून समर्थ सावंत, अमेय मुर्चावडे यांनी चांगला खेळ केला. मुलींच्या गटात राजमाता भिलवडी – सांगली संघाने ज्ञानविकास ठाणे संघावर एक डाव व एक गुण राखून विजय मिळवला. सांगली संघाकडून धनश्री तामखडे, श्रावणी तामखडे आणि विद्या तामखडे यांनी अष्टपैलू खेळ केला. तर ठाणे संघाकडून धनश्री कंक आणि श्रावणी घाडगे यांनी विजयासाठी पराकाष्टा केली.

वैयक्तिक पारितोषिके – १४ वर्षांखालील मुले : उत्कृष्ट संरक्षक आयुष यादव शिवप्रतिष्ठान खंडाळा, उत्कृष्ट आक्रमक : वेदांत गायकवाड रमणबाग पुणे, सर्वोत्कृष्ट खेळाडू : वरद पोळ शिवप्रतिष्ठान खंडाळा. तर मुलींच्या गटात – उत्कृष्ट संरक्षक : वेदिका तामखडे राजमाता होळकर क्रीडा मंडळ सांगली, उत्कृष्ट आक्रमक : श्रेया जाधव राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ पुणे, अष्टपैलू खेळाडू : सई गराडे राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ पुणे, १८ वर्षांखालील मुले – उत्कृष्ट संरक्षक : अमय मूर्चावडे मुंबई उपनगर, उत्कृष्ट आक्रमक : तरबेज खान खंडाळा, अष्टपैलू खेळाडू : लोकेश जाधव खंडाळा तसेच मुलींच्या गटात – उत्कृष्ट संरक्षक : धनश्री कंक ठाणे, उत्कृष्ट आक्रमक : धनश्री तामखडे भिलवडी सांगली, अष्टपैलू खेळाडू : श्रावणी तामखडे भिलवडी सांगली यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button