रत्नागिरी

उत्पादन शुल्क विभागाच्या जागेत देशातील चांगले बौद्ध विहार उभारणार : पालकमंत्री ना. उदय सामंत

कम्युनिटी सेंटर नव्हे तर ते बौद्ध विहार असेच नाव राहणार

रत्नागिरी दि. २५ :- येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेत देशातील अतिशय चांगलं बौद्ध विहार उभारण्यात येणार असून, त्याचे नामकरण बौद्ध विहार असेच राहणार आहे. तिथे कुठेही कम्युनिटी सेंटर असा उल्लेख नसेल. काही लोक राजकारण करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहेत. केवळ उदय सामंत यांना त्रास देणे हाच या लोकांचा अजेंडा आहे, अशी स्पष्ट भूमिका रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

रत्नागिरी शहरांमध्ये होणाऱ्या बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये काल एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही घडलं नाही हे जनतेसमोर ठेवून आंबेडकरवादी चळवळीतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या पत्रकार परिषदेत केला गेला, असे यावेळी ना. सामंत म्हणाले. मला असं वाटतं की काही राजकीय लोकांनी ठरवून ही पत्रकार परिषद करायला लावलेली असावी अशी एक शंका येते, कारण ज्याच्यात काहीच तथ्य नाही अशा पद्धतीचे मुद्दे काल त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले गेले.

याबाबतची पत्रकार परिषद नगरपालिका देखील घेऊ शकली असती, जिल्हा प्रशासन देखील घेऊ शकली असती, मला ती घेण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला मी काय चांगलं केलंय हे सांगण्याच्या दृष्टीनेही पत्रकार परिषदेचे मी आयोजन केलेलं आहे, असे सामंत म्हणाले.

ज्या ठिकाणी थिबा राजांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे ती उघड्यावर आहे, तिथे चांगल्या पद्धतीचं बौद्ध विहार व्हावं ही सगळ्याची इच्छा होती आणि माझी देखील इच्छा होती. याची खरी सुरुवात गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना झाली कारण ती जागा जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, राज्य उत्पादन शुल्क मंत्री हे शंभूराजे देसाई झाले. त्यावेळी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जागेची मागणी ही मंत्री महोदयांकडे केली आणि अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये ही जागा बौद्ध विहारासाठी देण्याचा निर्णय झाला.

या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे देशातील चांगले बौद्ध विहार उभं राहावं यासाठी साडेआठ कोटी रुपये नियोजन मंडळात मंजूर करण्यात आले. पण नियोजन मंडळातनं मंजूर करत असताना तिथे टेक्निकल म्हणून आम्ही त्याला कम्युनिटी सेंटर असं म्हटलं. पण कम्युनिटी सेंटर म्हटल्यानंतर देखील ताबडतोब तातडीने आम्ही नियोजन मंडळाचा निर्णय घेतला. नगरपालिकेच्या जनरल बॉडीनं त्याच्यामध्ये ठराव घातला आणि माझ्या देखील मीटिंगमध्ये आम्ही मिनिट्स बनवले की ते तिथे बौद्ध विहार म्हणूनच मानलं जाईल आणि त्याचं नाव हे बौद्ध विहारच असेल. आपल्याला त्या कामासाठी निधी द्यायचा होता म्हणून आपण तो शब्दप्रयोग केला होता. पण याचं काही लोक नाहक राजकीय भांडवल करून समाजाला गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे बौद्ध विहार असून, त्याचं नाव बौद्ध विहारच असणार आहे. तिथे कुठेही कम्युनिटी सेंटर असा उल्लेख नसणार आहे, असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

बौद्ध विहार कोणाच्या ताब्यात असणार याबाबत बोलताना ना. सामंत म्हणाले की, ही शासनाची जमीन आहे. मी अनेक बैठकांमध्ये सांगितले की, शासनाची जमीन प्रायव्हेट लोकांना देता येत नाही. ती कदाचित अशा पद्धतीची जर तुम्ही सुरू केली तर ही जागा परत राज्य उत्पादन शुल्क घेऊ शकतो. त्याच्यामुळे बौद्ध विहार बांधल्यानंतर ती कमिटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होईल जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत हे सगळं काम पाहिले जाईल. परंतु याच्यावर सगळ्या संस्थांमधला एक एक प्रतिनिधी हा त्याच्यामध्ये घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button