रत्नागिरी

फाटक हायस्कूलचा ड्रॉईंग ग्रेड परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा कायम

जान्हवी भुवड, अस्मि कानसे, तीर्था सागवेकर आणि अन्विक्षा भेलेकर चा राज्य गुणवत्ता यादीत समावेश; सहा विद्यार्थी पारितोषिकांचे मानकरी

संगमेश्वर दि. १२ ( प्रतिनिधी ) :- राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये फाटक हायस्कूल, रत्नागिरीने घवघवीत यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील चार विद्यार्थ्यी राज्य गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून एकूण सहा पारितोषिकांची लयलूट केली आहे. परीक्षेला प्रविष्ट ६९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६२ विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त केली आहे.

इंटरमिजिएट परीक्षेला एकूण ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्व उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. यातील ३१ विद्यार्थ्यांना ए श्रेणी दोन विद्यार्थ्यांना बी श्रेणी तर एका विद्यार्थ्याला सी श्रेणी मिळाली आहे. या परीक्षेत जान्हवी सुरज भुवड हिने राज्य गुणवत्ता यादीत ७ वी आली असून तिला भूमिती आणि अक्षरलेखन विषयात पारितोषिक प्राप्त झाले आहे. अस्मी नितीन कानसे राज्यात ७१ वी आणि तीर्था निलेश सागवेकर राज्यात ८२ वी अशा तीन विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे.

एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेला प्रविष्ट झालेले ३५ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये ३१ विद्यार्थ्यांना ए श्रेणी व चार विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त केली असून अन्विक्षा संजय भेलेकर ही राज्य गुणवत्ता यादीमध्ये ५३ वी आली असून तिला ऑब्जेक्ट ड्रॉईंग विषयामध्ये पारितोषिक प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांसाठीचा सफर रंगांची उपक्रम, माजी विद्यार्थ्यांबरोबरच चित्रकारांचे मार्गदर्शन, एप्रिल पासूनचे जादा तास यामुळे उज्ज्वल यश संपादन करता आल्याचे संस्थेचे सचिव दिलीप भातडे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेला सातत्यपूर्ण सराव, पालकांचे सहकार्य आणि कलाशिक्षकांचे अचूक मार्गदर्शनामुळे उज्ज्वल यश प्राप्त होऊ शकले असे कलाशिक्षक निलेश पावसकर यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक दिलीप भातडे व निलेश पावसकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये व संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button