लग्नापूर्वी कुंडली नको, रक्ताचा रिपोर्ट जुळवा; साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात थॅलेसेमिया जनजागृती

रत्नागिरी दि. ७ : “ज्याप्रमाणे शहराची मुख्य जलवाहिनी गंजली तर संपूर्ण शहर तहानलेले राहते, तसेच रक्ताhतील हिमोग्लोबिन कमी पडले तर शरीर थकते. थॅलेसेमिया रोखण्यासाठी समाजाने लग्नापूर्वी केवळ कुंडलीचे गुण न पाहता रक्ताचा एचबी इलेक्ट्रोफोरोसीस (Hb Electrophoresis) रिपोर्ट जुळवण्याची क्रांती घडवावी,असे प्रभावी आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी संजय डोर्ले यांनी केले. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त (८ मे) प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे आयोजित विशेष जनजागृती व मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा समन्वयक डॉ उत्तमराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात दि. १ मे ते ८ मे दरम्यान “थॅलेसेमिया सप्ताह” साजरा करण्यात येत असून विविध आरोग्य संस्थांमार्फत जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानांतर्गत साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “एक पाउल थॅलेसेमिया मुक्तीकडे”असे या मोहिमेचे घोषवाक्य आहे.
यावेळी केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी “थॅलेसेमिया मुक्त भारत” घडविण्याचा संकल्प केला.
डॉ. सृष्टी डोर्ले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रक्तातील हिमोग्लोबिन हे शरीरासाठी ‘ऑक्सिजन इंजिन’ प्रमाणे कार्य करते. थॅलेसेमिया रुग्णांमध्ये हे इंजिन कमकुवत असल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्ण निस्तेज व अशक्त होतो. हा आजार संसर्गजन्य नसून पूर्णतः आनुवंशिक आहे. ‘थॅलेसेमिया मायनर’ असलेल्या दोन व्यक्तींचे लग्न झाल्यास त्यांच्या अपत्याला ‘थॅलेसेमिया मेजर’ होण्याची शक्यता वाढते. अशा बालकांना दर १५ ते ३० दिवसांनी नियमित रक्त द्यावे लागते.
थॅलेसेमियावर नियमित रक्तसंक्रमण, आयर्न चेलेशन थेरपी तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट यांसारखे उपचार उपलब्ध असले तरी रक्त ही या रुग्णांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या जनजागृती मोहिमेत आरोग्य सहायक भस्मे, स्टाफ नर्स श्रीम. बी. के. गुरव, एलएचव्ही श्रीम. डी. डी. सावंत, फार्मसी ऑफिसर अनमोल यादव, आरोग्य सेविका श्रीम. एस. एस. गावडे , लॅब ऑफिसर एन. एम. पटेल,आरोग्य सेवक जे. पी. पाटील,चालक व्ही. व्ही. आंबवकर, डेटा एंट्री ऑपरेटर अश्विनी शिंदे,टेली स्टाफ श्रीम. तीर्था भोसले, विकास कदम तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


