कर्जमाफीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना, बळीराजाला ताकद देणे आहे – ना. उदय सामंत

रत्नागिरी दि. ३१ :- महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी, बळीराजांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. बळीराजाला ताकद म्हणजे आपण ज्याच्या जीवावर दोन वेळेच जेवतो, त्याला ताकद देणं म्हणजे महाराष्ट्राला ताकद देणे आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ताकद देण्यासारखं आहे आणि ती संस्कृती आज महायुतीच्या सरकारने जोपासली आहे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी येथे मांडली.
यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले की, ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय, सततचा पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतोय आणि याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती की कर्जमाफी झाली पाहिजे, ती कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही कर्जमाफी करत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे की, ज्यावेळी विधानसभेच्या अगोदर आम्ही सरकारमध्ये होतो आणि लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरे गेलो त्यावेळी वचननामा तयार केलेला होता. वचननामा तयार करत असताना त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते. या वचननाम्यात आम्ही शेतकऱ्यांवर पावसामुळे असेल, दुष्काळामुळे असेल जे काही संकट येतात त्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी,बळीराजाला बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू, ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला होता तो आज मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी पूर्ण केला हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत कर्जमाफी नक्की होईल. दुष्काळ परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे, असे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
कोकणातील भात पिक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश
अतिवृष्टीमुळे रत्नागिरीमध्ये कापलेल्या भाताचे नुकसान झालेलं आहे. शेतात असलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे, त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कोकण आयुक्तांना दिलेल्या आहेत. माझे देखील बोलणं झालंय. आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं. हे सगळे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पुढील चार-पाच दिवसांमध्ये हे पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.



