देवरुख येथील सुप्रसिद्ध केतकर ज्वेलर्सच्या मालकांचे अपहरण आणि लूटप्रकरणी चारजण पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी दि. २४ :- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख सह्याद्रीनगर येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) यांचे अपहरण करून त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याप्रकरणी पोलिसांनी चारजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात आणखी काही जणांचा समावेश असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक श्री. सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे म्हणाले की, अपहरणकर्त्यांनी केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेकडून पाच लाखाची खंडणी मागितली. पैसे उकळणे हा अपहरणकर्त्यांचा प्रयत्न होता. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास काम सुरू केले. या तपास कामासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली.

बदलापूर, नवी मुंबई पर्यंत शोध काम करण्यात आले. या तपासात पोलिसांना यश येऊन चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातील गाडी आणि रोख रक्कम जवळपास एक लाख जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांपैकी दोनजण संगमेश्वर तालुक्यातील असून, दोनजण बदलापूर येथील आहेत. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा समावेश आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास पोलिस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, चार जणांपैकी दोन जण संगमेश्वर तालुक्यातील असून हे दोघेही बदलापूर येथील दोघांशी संपर्कात होते. केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर यांना अपहरण करून त्याना लुटणे आणि त्यांच्याकडून खंडणी मागणे हा गुन्हा या आरोपींनी प्लॅन करून केला होता, असे चौकशीत समोर आले आहे. येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे पोलिस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी सांगितले.
या गुन्ह्याचा अधिक तपास देवरुख पोलीस ठाणे करीत आहेत. ही, कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग श्री. सुरेश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. उदय झावरे व पथक तसेच खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
यात श्रे.पो.उनि. श्री. संदीप ओगले, श्रे.पो.उनि. प्रशांत बोरकर, सपोफौ/868 पांडुरंग गोरे, सपोफौ/1188 सुभाष भागणे, पोहवा/477 नितीन डोमणे, पोहवा/251 शांताराम झोरे, पोहवा/288 विनायक राजवैद्य, पोहवा/301 बाळू पालकर, पोहवा/338 विक्रम पाटील, पोहवा/909 विजय आंबेकर, पोहवा/306 गणेश सावंत, पोहवा/1410 सत्यजित दरेकर, पोहवा/265 योगेश नार्वेकर, पोहवा/1407 दिपराज पाटील, पोहवा/1238 प्रविण खांबे, पोहवा/1067 अमित कदम, पोहवा/262 विवेक रसाळ, पोहवा/1362 भैरवनाथ सवाईराम, पोहवा/1408 योगेश शेट्ये, पोहवा/799 विनोद कदम, चा. पोशि/215 अतुल कांबळे, चा.पो.ना/1532 दत्ता कांबळे, पोहवा/444 रमिज शेख, पोकॉ/327 निलेश शेलार व मपोकॉ/1358 शितल पिंजरे आदी पोलिसांचा समावेश होता.



